Testimonials

Guppa 2023

आदरणीय यतीन भाई आणि सुहासिनीताई तसेच शहा परिवारास विनम्र वंदन...
ज्याच्या काळजात सोनं पिकतं तोच मातीला गंध देऊ शकतो. आपणही असेच सोलापूरच्या मातीला शैक्षणिक, सामाजिक आणि सांस्कृतिक बाबतीत समृद्ध करू पाहणारे, सामाजिक ऋणांना मानणारे एक जगावेगळे उद्योजक म्हणून आपली प्रतिमा चंद्र-सूर्य असेपर्यंत सोलापूरकरांच्या हृदयात राहील.. हे नक्की..कालचा 'म्हारो पधारे देस..' कार्यक्रम अत्यंत छान झला. काहीसा हटके ! आणि भारताची सांस्कृतिक परंपरा थेट सोलापूरकरांपाशी आणणारा!
गेल्या दीड तपाच्या १८ वर्षांच्या वाटचालीत प्रिसिजन फाउंडेशन हे सोलापूरच्या सामाजिक गुरुपदी पोहोचलेय.. असं म्हटलं तर किंचितही वावगे होणार नाही.प्रिसिजनच्या प्रत्येक कार्यक्रमास मी विद्यार्थी म्हणून येतो. ऐकतो, पहातो. यावर्षी पहिल्या दोन कार्यक्रमांना अत्यंत अपरिहार्य कारणाने येऊ शकलो नव्हतो. माझी ही अॅबसेन्टी सुहासिनी ताईंनी बोलून दाखवली. तसेच सभागृहात दोन-तीन व्हॉलेंटियर्सनीसुद्धा काल परवा नव्हता, आपली आम्ही वाट पहात होतो. अशी स्नेहाने-मायेने विचारणा केली.
एखादा माझ्यासारखा छोटा कलाकार नाही दिसला, तरी त्याचीही जाणीवपूर्वक दखल घेणारे आपण खरेच खूप खूप गुणवंत आहात.दरवर्षी तुमच्या कार्याबद्दल वाटणा-या भावना तुम्हाला कशा सांगाव्या ? याचं वरचेवर वरचेवर कोडेच पडतं !
प्रत्येक वेळी व्यक्त व्हायलाच पाहिजे असंही नसतं, परंतु प्रिसीजनच्या कार्यक्रमातून बाहेर पडताना भावना दाटून येतातच आणि हे असे शब्दही आपोआप बाहेर पडतात. आपल्या पुढील कार्याला खूप खूप शुभेच्छा.. विख्यात उद्योजक म्हणून आपल्या उद्योगांना वैश्विक स्तरावर ईश्वर सतत अग्रेसर नेवो, त्याचबरोबर आपल्या हातून अशीच समाजसेवाही घडत राहो..हीच परमेश्वर चरणी प्रार्थना..
-दीपक कलढोणे

सोलापूरकरांना समृद्ध करणारी गप्पांची भेट दिल्याबद्दल धन्यवाद.

Well planned as usual. Dedicated team No words to express our gratitude such an appreciation for all the effort and effort you put into making this guppa festival possible

We, as solapurkars, should thank u, for giving such a treat
As usual it’s one of the best The cleanliness, the disciplined behaviour of every one, warm welcome by Shah Family add feathers to it Most appreciating part is the selection of performance and artists, this has been consistently good.
I must appreciate your social contribution and encouragement given to other groups in the form of awards May god bless u all

आदरणीय डॉ. सुहासिनीजी शहा आणि यतीनजी शहा सर.. नमस्कार प्रिसिजन गप्पांचे तीन दिवस मंतरलेले होते. किंबहुना यानिमित्ताने दिवाळीच्या अगोदरच सांस्कृतिक गप्पांची अनोखी दिवाळी अनुभवता आली. डॉ. अभय बंग यांची मुलाखत अंतर्मुख करणारी होती. ' बाईपण भारी देवा..' च्या निमित्ताने दिग्दर्शक केदार शिंदे, रोहिणी हट्टंगडी आणि सुकन्या कुलकर्णी अशा बड्या कलावंतांची धमाल पाहता आली. समीरा गुजर यांनीही मुलाखत छान रंगवली. समारोपात 'पधारो म्हारे देस..' हा खरोखर सांस्कृतिक उंची वाढविणारा वेगळा प्रयोग होता. शतकानुशतके जतन करून ठेवलेल्या राजस्थानी पारंपारिक संगीताचा कर्णमधूर वारसा पाहता आणि ऐकता आला. तो मनापासून भावला. एकंदरीत, 'प्रिसिजन गप्पा' आता केवळ प्रिसिजन फाऊंडेशन किंवा प्रिसिजन परिवारापुरत्या मर्यादित नाहीत तर त्या अवघ्या रसिक सोलापूरकरांच्या ठरल्या आहेत, हे निःसंशय मान्य करावे लागेल. भविष्यात आपल्या 'प्रिसिजन गप्पां'तून सोलापूरची सांस्कृतिक श्रीमंती वाढावी, या शुभेच्छांसह.. आपणांस दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा !

Entrepreneurship is comprehensive only when it encourages not only professional growth of the entrepreneur’s managers & all other employees but also nurtures cultural development amongst them & amongst the society as well.
Besides business goals your success in these areas are also scintillating. Since change is only constant I wish that the change in you, family & your team is depicted by the growth in the magnitude & gamut of such goals that you always accomplish.

One of the excellent program Best wishes to Team Precision

प्रिसीजनच्या यशाचा गोवर्धन उचलणारा,यतीन नावाचा श्रीकृष्ण.सहकारी गोपाळांच्या काठ्या.शिवाय हा गोवर्धन उचलण्यात,सौ.सुहासिनी नावाच्या राधेचाही, मोठा सहभाग, हे, या गोकुळाचे, आगळे वैशिष्ट्य. हे गोकुळ, आम्हा सोलापूरकरांच्या,अभिमानाचा विषय आहे. कृतज्ञतापूर्वक नमस्कार.

Respected Yatin Shah Sir and Suhasini Bhabhi jee and Precieon Founderion Pariwar…
Namaskar…
Jay Shri Krishna… Jay Jinendra…
Greetings….
Thank You very much for inviting us for the “Precision Gappa”. For 15 consecutive years in a row “Precision Gappa” event has taken place and it is our Privilege to receive your invitation consistently every Year. Actually we cannot express our appreciation for this most awaited event in mere words. All citizens of Solapur are very fortunate to see and attend ‘Precision Gappa’ as it has been an intellectual celebration. As soon as the Diwali festival comes around the corner, this lovely event keeps us on our toes to know the dates of ‘Precision Gappa’.
Even the Rangbhavan building might be waiting for it, as it’s the only time when this building gets well decorated and looks lavish and graceful with the beautiful Rangoli design and rose aroma everywhere.We are sure that the ‘Precision Gappa’ 6.20PM program will keep us giving eternal pleasure till the Sun keeps shining. We know that all this success could happen because of Your Dynamic Leadership and your team’s Discipline, impeccable management, your encyclopaedic relations in all layers of society and hard work. Chavan family Congratulations you all for living these virtues and wishing All the Best…! We look forward to meeting you in the ‘Precision Gappa’…6.20pm
With Warm Regards
Laxmi & Babu

Thank you so much to the Precision Foundation team for giving us a chance to arrange this beautiful event Akshar Triveni. We really appreciate the way you managed this entire event Precision Guppa and even the hospitality which was provided to us. The audience was really enthusiastic and so our team was encouraged to perform even better. We were very impressed by your consistency of starting the show exactly at 6.25 pm sharp for the last 10 years. We salute this tradition of yours.

We hope that we would arrange various events in future together. We will try our best to come with various innovative ideas to offer to your audience. Thank you once again.

प्रिसिजन परिवार !
सस्नेह नमस्कार !
आम्ही आज सकाळी मुंबईत सुखरूप परतलो. काही लिहायच्या आधी, ‘स्वयं’ला सोलापुरात सर्वात प्रथम व्यासपीठ देऊन आपण जो या संकल्पनेचा गौरव केलात, त्याबद्दल मी आमच्या टीमतर्फे आपल्याप्रती ऋण व्यक्त करतो. हा कार्यक्रम आपल्यासहित सोलापूरकरांनाही आवडला असेल अशी आशा करतो. कार्यक्रम अधिक चांगला होण्याच्या दृष्टीने आपल्या काही सूचना असतील तर त्यांचे निश्चित स्वागत आहे.  

‘प्रिसिजन गप्पांचा’ संपूर्ण अनुभव आम्हा सर्वांना समृद्ध करणारा होता. सकाळी स्टेशनवर उतरल्यापासून ते रात्री परत स्टेशनवर जाईपर्यंत प्रत्येक अनुभव अविस्मरणीय होता. आपल्या कंपनीच्या नावाप्रमाणे अगदी लहान लहान गोष्टींच्या नियोजनातही अचूकता होती. पण विशेष म्हणजे, त्या अचूकतेत शुष्कपणा नव्हता. अगत्य होतं, आपुलकी होती, प्रेम होतं. आपण स्वतः आमच्यासोबत दुपारच्या जेवणास उपस्थित असणे, संध्याकाळी आपण सहकुटुंब आमच्या स्वागतास हजर असणे हे सर्व मनाला स्पर्शून गेलं. माधव देशपांडे व त्यांच्या संपूर्ण टीमच्या सुनियोजित कामाला दाद द्यावी तितकी कमीच आहे. कार्यक्रम बरोब्बर ६.२५ वाजता सुरु करणे, तांत्रिकदृष्ट्या सर्व बाबी चोख असणे, कार्यक्रम देखणा व प्रेक्षणीय असणे या सगळ्यामागे किती कल्पकता, नियोजन आणि किती जणांची मेहनत असेल, हे मी एक आयोजक म्हणून समजू शकतो.  

‘स्वयं’च्या निमित्ताने झालेलं हे मैत्र पुढील काळात वृद्धिंगत होईल अशी आशा आहे. ‘स्वयं’चे काम आपण जाणताच. ‘अमृतयात्रा’च्या माध्यमातून आम्ही भारतातील प्रेरणादायी व्यक्ती आणि संस्था पर्यटनाच्या माध्यमातून समाजाशी जोडत आहोत. त्यामुळे स्वयं व अमृतयात्रा च्या कामामुळे समाजासाठी विविध क्षेत्रात उत्तम काम करणाऱ्या व्यक्ती व संस्था यांचे एक छान नेटवर्क तयार होत आहे. ‘प्रिसिजन फौन्डेशन’च्या उद्दिष्ट पुर्तींसाठी ‘स्वयं’ व ‘अमृतयात्रा’ तर्फे कुठल्याही प्रकारचे योगदान देण्यात आम्हाला नेहमीच धन्यता वाटेल. ‘प्रिसिजन फौन्डेशन’च्या भविष्यातील प्रकल्पांसाठी व येणाऱ्या दिवाळीनिमित्त आपल्याला व संपूर्ण टीमला अनेक शुभेच्छा. धन्यवाद !

प्रिसीजन गप्पा... एक मेकॅनिकल इंजिनिअर, क्रिकेट,गाणे,अभिनय,लेखन अशा गोष्टींमध्ये इंटरेस्ट! बालनाट्यापासून एकपात्री अभिनय करताना मधे येणारे चित्रपट, सिरियल, नाटकं अशा गोष्टी सहज करणारा,वयाच्या ७५ री मधेही नवीन शिकायचं आहे म्हणणारा आणि यश मिळवूनही ते डोक्यात न जाऊ देता पाय जमिनीवर असणारा कलाकार म्हणजे दिलीप प्रभावळकर! अतिशय प्रांजळपणे आपला अभिनय प्रवास उलगडून दाखवताना कधी खळखळून हसवलं,तर कधी हसता हसता डोळे ओलावून टाकले! शेवटचा कृष्णराव हेरंबकर तर सगळ्यांना हलवून गेला! सभागृहाच्या पायर्या उतरताना नकळतच बरोबर असलेल्या, ओळखीच्या किंवा अनोळखी लोकांना आज कित्येक जणांनी हात दिला! ही किमया साधली फक्त एका अद्वितीय अभिनयातून जाणवलेल्या कळकळीच्या बोलण्याने! शतशः प्रणाम!

प्रिसिजन परिवाराला प्रणाम..
दिपावलीच्या पूर्वसंध्या..
उजळीती ज्ञानज्योती..
प्रिसिजन गप्पांमधून तेवती
समाजप्रकाशु..
तुडुंब तुडुंब मने भरती
सुसंस्कारित फराळताटे
विचारधन अमोघ भेटे
जनामनासी...

प्रिसिजन गप्पा माध्यमातून आम्हाला प्रिसिजन परिवारात सहभागी होता आलं. याचा आनंद झाला. .. यतिन सरांची नजर बरंच काही सांगून जाते. त्यामुळे काम करताना दडपण न येता स्मूथपणे काम करता आलं. प्रिसिजन टीमचे सहकार्य आणि रंगभवनने दिलेली सवलतीमुळे आम्हाला मोकळंचाकळं वावरता आलं. त्यामुळं असा देखणा सोहळा निर्विघ्नपणे पार पडला. धन्यवाद....

प्रिसीजन गप्पा !....एक दिव्य सुरुवात !!! कार्यक्रमाचे काटेकोर नियोजन ; स्वच्छता , टापटीप, उच्च दर्जा ; हायटेक,नेत्रदीपक सुरुवात; अतिथींचे स्वागत करताना प्रिसीजनची विनम्रता ; आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे ६:२५... या सर्व गोष्टीनी मनाला एक नवचैतन्य मिळाले ! ६.२५ वाजता कार्यक्रमाला सुरुवात झाली आणि ६.४८ ला "तुझे गीत गाण्यासाठी..." या गीताने इतकी उंची गाठली की ...पुढील 3 तास आम्ही रसिक खाली उतरायला तयारच नव्हतो ! कारण बऱ्याच दिवसानंतर आपल्या भावविश्वात डुंबायची संधी मिळाली होती ! अर्थात आजच्या कार्यक्रमाच्या यशाचे श्रेय माधव सरांकड़े जाते.कारण कार्यक्रमाचा दर्जा,प्रकाश योजना व सर्वात महत्त्वाचे म्हणजे ध्वनी योजना सांभाळणे खूप महत्त्वाचे होते,आणि माधव सर अनुभवी व तज्ञ असल्यामुळे दर्जेदार अनुभूती मिळाली. आज आम्ही पावणे सहा वाजता गेलो होतो तरी मागील बाजूस थोड्या खुर्च्या रिकाम्या होत्या. सहा वाजता तर रंगभवन पॅक झाले ! उद्या तर रविवार आणि दिलीप सरांची भेट; साडे पाच वाजता जाऊन बसावे लागेल !

प्रिसीजन गप्पा मधील आजची पर्वणी अप्रतिम, कौतुक करावे तितके कमीच. या निमित्ताने मिती क्रिएशन चा विशेष कार्यक्रम सोलापूरकरांना अनुभवता आला,आनंद घेता आला. या गप्पांच्या निमित्ताने पुल, गदिमा, सुधीर फडके व यशवंत देव यांची आजवर न जाणलेली माहिती व इतकी अप्रतिम गाणी एकूण कान व मन तृप्त झाले. शहा परिवार व प्रिसीजन परिवाराचे आभार व्यक्त करावे तितके कमीच, नित्य नव्याने सोलापूरकरांना आपणाकडून खूप काही शिकण्यास मिळते हे आमचे व सोलापूरचे अहोभाग्यच !

प्रिसीजन गप्पा हा कार्यक्रम अतिशय सुंदर झाला.गेले तीन दिवस या कर्यक्रमाने अगदी भारावून गेलो.कार्यक्रमाचे अतिशय नियोजनबद्ध केलेली आखणी,अचूक वेळेचे नियोजन,आणि अतिशय विनम्रपणाने हसमुखपणे प्रिसीजन परिवाराने रसिक प्रेक्षकांचे केलेले स्वागत या सर्व गोष्टी मनाला स्पर्शून गेल्या.तीन दिवसातील प्रत्येक कार्यक्रम खास होता,आम्हा सोलापूरकरांसाठी हि एक मेजवानी होती.सामाजिक कृतज्ञता हा पुरस्कार पाहताना डोळ्यात पाणी तरारले,किती हि मूलखावेगळी माणसे शोधून काढली होती,यांचे प्रचंड काम पाहून असे वाटले की काही माणसे स्वतःचे जगणे हे दुसऱ्यांसाठी जगतात अगदी निरपेक्षपणाने,आणि अशा या हिऱ्यांचा शोध प्रिसीजन परिवाराला लागतो त्यांच्या माध्यमातून हि जगावेगळी माणसे समाजासमोर येतात. या लोकांचे काम पाहून अंगावर शहारे येतात. या कार्यक्रमामुळे एक नवीन ऊर्जा मिळाली. प्रिसीजन परिवाराचे खूप खूप आभार. या निमित्ताने खूप नवीन विचार मिळाले.

Baithak @ School

काल दिनांक १२/०९/२०२३ रोजी नेहमीप्रमाणे आमच्या शाळेत बैठक @ स्कूल उपक्रमांतर्गत आणखी एका शास्त्रीय संगीत कलेचे सादरीकरण म्हणजे अनुभव सादर करण्यात आला. आजची संगीत कला सादर झाली ती म्हणजे - स्पॅनिश वीणा!

आपल्या शाळेत यावेळी स्पॅनिश वीणा कार्यक्रम सादर होणार हे कार्यक्रम पत्रिकेत वाचल्यापासून दोन दिवस स्पॅनिश आणि वीणा या दोन शब्दांभोवतीच मन रेंगाळत होतं. मनाशी ठरवलंच होतं की पाश्चिमात्य आणि भारतीय असे दोन वेगवेगळे नावं एकत्र करुन या वाद्याला स्पॅनिश वीणा हे नाव का बरं दिलं गेलं असेल? त्यामागील इतिहास नेमका काय असेल? या वाद्याची निर्मिती कोणी केली असेल? हे स्पॅनिश वीणा वादक आल्यानंतर त्यांना विचारायचंच. या वाद्याच्या नावामुळे त्यातील उत्सुकता अधिक वाढली होती. शेवटी आज या प्रश्नांची उत्तरेही मिळाली आणि ती ही चक्क या स्पॅनिश वीणा निर्मात्याकडूनच! त्यांचे नाव आहे - सचिन पटवर्धन!

विश्वास बसत नव्हता की दोन दिवस पडलेले प्रश्न असे साक्षात वाद्याच्या निर्मात्याकडून मिळतील आणि ते ही अगदी समोरासमोर बसून! हे शक्य होत आहे ते केवळ प्रिसिजन फाउंडेशन आणि बैठक फाउंडेशनमुळे!

सुप्रसिद्ध सरोद वादक उस्ताद अमजद अली खान यांच्याकडून सरोद वाद्याचे शिक्षण घेतलेल्या आणि या वाद्याच्या वादनातूनच नावलौकिक मिळवलेल्या सचिन पटवर्धन सरांना सातत्याने सरोद वादन करुन हाताच्या नखांना गंभीर इजा झाली आणि त्यातून डॉक्टरांनी सांगितलं की, "यापुढे तुम्ही सरोद वाद्य वाजवू शकणार नाही." हे ऐकून ज्या कलेसाठी आयुष्य समर्पित करायचा ध्यास घेतला होता तो मार्गच बंद होणार होता. अशा बिकट प्रसंगात ही त्यांनी हार न मानता स्पॅनिश गिटार या वाद्याला modify करुन स्पॅनिश वीणा हे वाद्य तयार केलं आणि आज या वाद्याच्या माध्यमातून त्यांनी जगभर नावलौकिक मिळवला आहे. संगीताचा उपयोग साधना म्हणून केल्यास त्या साधकात किती सामर्थ्य येते हे आज अनुभवता आले.

पटवर्धन सर या स्पॅनिश वीणा निर्मितीमागचा इतिहास सांगत होते, "माझ्या कुटुंबातच संगीत आहे. माझे वडील प्रसिद्ध संगीतकार आहेत. सरोद वादन करत असताना मी स्पॅनिश गिटारचे ही शिक्षण घेतले आहे. जेव्हा समजलं की मी सरोद वाजवू शकणार नाही तेव्हा २५ वर्ष ज्या कलेसाठी समर्पित केले त्यापासून दूर जाणं शक्य नव्हतं कारण Music is my heart! सरोद नखांनी वाजवतात आणि स्पॅनिश गिटार बोटांनी... त्यामुळे मी सरोद वाजवू शकत नाही पण गिटार तर वाजवूच शकतो आणि मग त्यातून प्रवास सुरु झाला तो स्पॅनिश गिटारमध्ये सरोद वाद्याच्या तांत्रिक गोष्टी आणून स्पॅनिश गिटार शास्त्रीय संगीतात कशी आणता येईल याचा! त्यासाठी एकूण सहा तारांचा वापर केला, त्यातील चार तारांवर वादन करताना दोन्ही बाजूच्या एक एक तारा ज्याला चिकारा म्हणतात त्या या वीणेतून उमटणाऱ्या स्वरांचा श्वास म्हणून काम करतात." त्यांच्याकडूनच त्यांचा स्वतःचा आणि गिटार ते वीणा हा प्रवास ऐकताना.. त्यांची कलेप्रती इतकी निष्ठा आणि साधना ऐकताना मला आठवत होते ते तानसेन! ज्यांच्या राग गायनाने अग्नी निर्माण व्हायचा, पर्जन्यवृष्टी व्हायची.... त्यामागे कारण होते त्यांनी साधनेने प्राप्त केलेली सिद्धी!

आज स्पॅनिश वीणा वादन सुरु झाले आणि अंगावर रोमांच उभा राहिले.... अगदी बराsssच वेळ! दुपारच्या शुद्ध सारंग रागातील आलाप आणि बंदिशी यांनी वातावरण काही क्षणात मैफिलीत रूपांतरित झाले. आणि तितक्यात तबल्यावर थिरकणाऱ्या हातांनी माहोल अधिकच बहरला आणि ते तबल्यावर लिलया फिरणारे हात होते रोहित मुजुमदार यांचे! पंडित सुरेश तलवळकर यांच्याकडे तबल्याचे शिक्षण घेतलेले रोहित मुजुमदार आणि सचिन पटवर्धन यांच्यात पाऊण तास जुगलबंदी सुरु होती आणि आम्ही त्या जुगलबंदीत ओलेचिंब होत होतो. मध्येच पाऊस थांबल्याचा भास व्हावा...तितक्यात पावसाची हलकी सर यावी आणि तितक्यात पुन्हा मुसळधार पाऊस सुरु व्हावा अशी अनुभूती देणारी ही जुगलबंदी संपूच नये असं वाटत होतं. वाह! क्या बात!! आहाहा असे दाद देणारे शब्द ओठांवरून अलगद ओघळत होते. आजची मैफिल ही फक्त श्रवणीयच नव्हती तर नजरेचं पारणं फेडणारी होती... कारण होते सचिन सर आणि रोहित दादा यांच्यात नजरेतून, स्मित हास्यातून आणि शब्दांतून एकमेकांना दिली जाणारी दाद! इतके मोठे कलाकार आपल्याकडे येतात, इतकी सुंदर कला सादर करुन जातात, त्यांच्याशी आपल्याला मोकळा संवाद साधता येतो आणि काही क्षण अशा महानुभावांचा सहवास लाभतो ही भावनाच कृतकृत्य झाल्यासारखा भाव मनात निर्माण करते आणि मान आणि मन आपसूकच नतमस्तक होते!

सादरीकरण संपलं आणि सुरु झाला कलाकार आणि मुलांमधील संवाद.... संवाद कसला प्रश्नोत्तरेच म्हणा की! मुलांनी एक से बढकर एक प्रश्न विचारले.....स्पॅनिश वीणाला किती तारा असतात? इथपासून ते तंबोरा जसा भोपळ्यापासून बनतो तसा स्पॅनिश वीणा कशापासून बनला आहे? अगदी इथपर्यंत प्रश्न! या मुलांच्या प्रश्नांचे कलाकारांनाही खूप कौतुक वाटले. त्यांनी मुलांच्या प्रत्येक प्रश्नाला त्यांना समजतील अशा सोप्या भाषेत उत्तरे दिली. जाताना दोन्ही कलाकारांनी शाळेचे केलेले कौतुक अधिक चांगले काम करण्याची प्रेरणा देऊन गेलेच पण या वास्तूत आल्यानंतर आम्हाला positive vibes जाणवल्या, तुमच्यावर स्वामी कृपा आहे. हे वाक्य ऐकून भरुन पावले. भारतीय संस्कृतीत सांगितलेल्या चौदा विद्या आणि चौसष्ट कला या विश्वाला लाभलेली अनमोल देणगी आहे असे वाटते. बैठक @ स्कूलसारख्या या उपक्रमामुळे आमचे मुलं उत्तम कानसेन तर व्हायला लागलेच आहेत पण काही दिवसांतच त्यांना हे ही लक्षात येईल की, " पाश्चात्य संगीताने केवळ शरीर डोलते, तर शास्त्रीय संगीतात अंत:करणाचा ठाव घेण्याची शक्ती आहे."
- अनघा राघवेंद्र जहागिरदार – गुधाटे मुख्याध्यापिका, श्रीमती कमला नेहरू प्राथमिक मराठी शाळा, जुळे सोलापूर.

Password campaign

साधारणतः 'आस्वाद' हा शब्द आपण पदार्थांच्या चवीसंदर्भात वापरतो. एखाद्या पदार्थाला चवीने खाणे म्हणजे आस्वाद घेणे असं आपण म्हणतो. पण 'आस्वाद' हा शब्द भरतमुनी यांनी त्यांच्या 'नाट्यशास्त्र' या ग्रंथात वापरल्याचे माझ्या वाचनात आले आहे. म्हणजेच साहित्यातील सौंदर्याचा अभिरुचीपूर्ण आस्वाद घेण्यालाच आपण म्हणतो "रसग्रहण"!
मात्र रसग्रहण जमण्यासाठी ती व्यक्ती आधी रसिक असावी लागते. पण रसिकता ही जशी उपजत अंगात असावी लागते, तशी ती अंगी नसेल तर बाणवताही येते बरं का! पण त्यासाठी लहान वयातच प्रयत्न झाले तर अधिक उत्तम! असे बालवयातच रसिकता बाणवायचे प्रयत्न करायला आमच्या सोलापूरमध्ये असलेलं आमचं हक्काचं रसिकतेचं मंदिर म्हणजे "प्रिसिजन फाउंडेशन!”
प्रिसिजन फाउंडेशनच्या अध्यक्षा आदरणीय डॉ. सौ. सुहासिनी शहा मॅडम, प्रिसिजन कॅमशाफ्ट कंपनीचे सर्वेसर्वा आदरणीय यतीन शहा सर यांच्या प्रेरणेने, प्रिसिजन जनसंपर्क अधिकारी माधव देशपांडे सर यांच्या मार्गदर्शनाने आणि संदीप पिसके सर आणि वैशाली बनसोडे मॅडम या सर्वांच्या सहकार्याने विविध शाळांमध्ये शास्त्रीय संगीत कलेवर आधारित 'बैठक @ स्कूल ', नाट्याभिनयावर आधारित 'नाट्यशिबीर' आणि वाचन कलेचा विकास व्हावा म्हणून 'पासवर्ड' अशा विविध उपक्रमांमधून संस्कारक्षम, बहुरंगी, बहुआयामी, बहुश्रुत सुजाण मुले घडविण्याचा ध्यास घेऊन ज्यांची प्रत्यक्ष अनुभूती घेणं तर सोडाच पण प्रत्यक्ष या गोष्टी पाहणं ही ज्या मुलांना शक्य नाही तिथे प्रिसिजन सारख्या उदात्त हेतूने झपाटलेल्या परिवाराच्या माध्यमातून विविध कलांचा आणि त्यातील सुप्रसिद्ध कलाकारांचा, साहित्यिकांचा सहवास लाभणं हे त्या मुलांचं आणि शाळांचं अहोभाग्यच !
आपण कोणत्या लोकांसोबत राहतो, वावरतो, तिथल्या वातावरणात रमतो त्याचे प्रतिबिंब आपल्या व्यक्तिमत्वात दिसायला लागते असं म्हणतात. या विविध उपक्रमांच्या माध्यमातून विविध क्षेत्रातील दिग्गज व्यक्तिमत्व, कलाकार यांना जवळून ऐकण्याचा, अनुभवण्याचा लाभ आम्हाला आणि आमच्या मुलांना मिळतो ही आमच्यासाठी खूप समाधान लाभणारी गोष्ट आहे. आमचे मुलं या अशा संवेदनशील, रसिक, उदात्त वृत्तीच्या, विचारारांच्या सेवाभावी परिवारासोबत काही क्षण घालवतात ही आमच्या मुलांच्या संस्कारक्षम उज्ज्वल भविष्याची नांदीच आहे.
या शैक्षणिक वर्षातील "पासवर्ड" या उपक्रमाचा पहिला अंक मुलांच्या हातात द्यायला आणि वाचन नेमकं कसं केलं पाहिजे? त्याचा आस्वाद कसा घेतला पाहिजे? हे मुलांना हसत खेळत अगदी सरळ, साध्या, सोप्या भाषेत सांगायला आले होते चित्रपट आणि संगीत यांचे अभ्यासपूर्ण रसग्रहण करणारे सुप्रसिद्ध व्यक्तिमत्व "मा. सुहास किर्लोस्कर!" आणि त्यांच्यासोबत युनिक फिचर्सच्या पासवर्ड ची किल्ली मुलांच्या हातात देणारे मुलांचे आवडते सचिनदादा! या पासवर्ड अंकाचे वाटप केल्यानंतर पुस्तक हातात पडताच ते वाचण्याची उत्सुकता असणारे आमचे बालचमू......
-अनघा राघवेंद्र जहागिरदार – गुधाटे, मुख्याध्यापिका, श्रीमती कमला नेहरू प्राथमिक मराठी शाळा, जुळे सोलापूर.

Baithak @ School

प्रिसिजन फाउंडेशन, सोलापूर आणि बैठक फाउंडेशन, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने गतवर्षांपासून सोलापूरमधील पाच शाळांमधील मुलांसाठी शास्त्रीय संगीताची बैठक मुलांमध्ये निर्माण व्हावी आणि मुले संगीत कलेकडे वळावेत या उदात्त हेतूने सुरु झालेला हा संस्कारक्षम उपक्रम यावर्षी पाच शाळांपासून दहा शाळांपर्यंत पोहचला.
मागील वर्षाच्या सहभागी पाच शाळांमध्ये संगीताच्या अनुभवासोबत त्याचा परिचय देखील मुलांना करुन देण्याचा अतिशय स्तुत्य, प्रेरणादायी संगीतमय प्रवास यावर्षी सुरु झाला आहे. संगीत ऐकणं, अनुभवणं आणि त्यात समरस होणं या प्रवासात मुलेही आनंदाने सहभागी झाले आहेत हे विशेष! गतवर्षी मुलांना शास्त्रीय संगीताचे विविध प्रकार ऐकायला आणि पाहायला मिळाले, तर यावर्षी हीच मुले संगीत अनुभवायला, त्यात समरस व्हायला लागले आहेत हे अनेक तानसेन, कानसेन, वादक, शास्त्रीय नृत्यपारंगत विद्यार्थी निर्माण होण्याचे शुभसंकेत आहेत असं म्हणायला हरकत नाही.
नादयुक्त गायन,वादन आणि नृत्य यांच्या तिहेरी संगमाला संगीत असे म्हणतात. संगीत हे सर्वांनी ऐकले पाहिजे कारण, संगीत ऐकल्याने आपले मन अगदी प्रसन्न होते. संगीत माणसाला मानसिक स्वास्थ प्रदान करते. संगीत कला ही सर्व कलामध्ये श्रेष्ठ कला मानली जाते. संगीतामधून आपण आपल्या भावना व्यक्त करू शकतो. जेव्हा आपण आनंदीत असतो तेव्हा संगीतातला शब्द आपल्याला समजतो पण जेव्हा आपण दुखात असतो तेव्हा त्या संगीतातल्या शब्दाचा अर्थ समजतो. संगीत आयुष्याला प्रेरणा देते. एकांतात स्वतःला ओळखण्यासाठीचा एकमेव मार्ग म्हणजे संगीत होय.
अशा संगीतमय सुमधुर प्रवासातील या शैक्षणिक वर्षाच्या पहिल्या संगीत बैठकीत कथक नृत्य विशारद साक्षी जोशी आणि स्वरूपा भोंदे यांनी कथक नृत्य सादरीकरणासोबतच या नृत्याचा परिचय ही मुलांना करुन दिला. यात सरस्वती वंदनेपासून सुरुवात होऊन प्रत्यक्ष मुलांचा सहभाग घेत त्यांना कथक नृत्यातील प्राथमिक ज्ञान कृतीतून देण्यात आले. त्यानंतर तबला विशारद पुष्कर महाजन यांनी एकल तबला प्रकारातून मुलांना कायदा, तुकडा असे वादनातील प्रकार समजावून सांगितले. तसेच 'सं' म्हणजे स्वर, 'गी' म्हणजे गीत आणि 'त' म्हणजे ताल मिळून संगीत शब्द तयार झाला आहे अशी महत्वपूर्ण माहितीही त्यांनी मुलांना सांगितली. त्यानंतर मुलांना याबद्दल प्रश्न विचारण्यात आले त्यात मुलांनी उस्फुर्त सहभाग नोंदवला. त्यांना संवादिनीवर नागनाथ नागेशी यांनी साथ दिली. तबला वादन सुरु असताना मुले ताल धरत होती, अचूक वेळी टाळ्यांनी दाद देत होती हे मागील वर्षीच्या बैठक चे फलितच!
अशा संस्कारक्षम बैठकी ची बालवयापासून मुलांना सवय लागली तर मुले मोठेपणी नको त्या बैठकीत जाणार नाहीत हे मात्र नक्की! या अतिशय सुरेल संगीतमय बैठकीचा एक छोटा भाग आम्ही आहोत याचा आम्हाला सार्थ अभिमान वाटतोय! छोटया छोटया गोष्टींचीदेखील दखल घेऊन कौतुकाची थाप आणि प्रेरणा देणाऱ्या, कायम पाठीशी उभा असणाऱ्या प्रिसिजन कॅमशाफ्ट, प्रिसिजन फाउंडेशनच्या त्याचबरोबर बैठक फाउंडेशन यांच्याही कायम ऋणात....
- अनघा जहागिरदार - गुधाटे., मुख्याध्यापिका, श्रीमती कमला नेहरू प्राथमिक मराठी शाळा, जुळे सोलापूर.

Baithak @ School

प्रिसिजन कॅमशाफ्ट या कंपनीच्या CSR निधीतून आज आमच्या श्रीमती कमला नेहरु प्राथमिक मराठी शाळेतील मुलांना शालोपयोगी असे अभ्यासासाठी डेसकीट देण्यात आले. हे अनोखे डेसकीट पाहून मुले हरखून गेली, त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद ओसंडून वाहत होता. यावेळी प्रिसिजन कॅमशाफ्ट कंपनीचे संदीप सर आणि वैशाली मॅडम उपस्थित होते. प्रिसिजन फाउंडेशनचे मनःपूर्वक धन्यवाद!!! आपली साथ म्हणजे आधाराचा हात जिथे धडपडणाऱ्या हाताला दातृत्वाची साथ मिळते ते म्हणजे प्रिसिजन!
-अनघा जहागिरदार - गुधाटे. मुख्याध्यापिका, श्रीमती कमला नेहरू प्राथमिक मराठी शाळा, जुळे सोलापूर.

Baithak @ School

आपल्या भारतीय संस्कृतीत अगदी वैदिक काळापासून शास्त्रीय संगीताला विशेष असे महत्व आहे. त्याकाळी सर्व कलांमध्ये संगीत ही सर्वश्रेष्ठ कला मानली जात होती. संगीत म्हणजे फक्त गायन नव्हे तर गायन, वादन, नृत्य सर्वांना मिळून संगीत संबोधलं जायचं. ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद व अथर्ववेद या चार वेदांमधील सामवेद हा संपूर्णपणे गायनावर आधारित असा वेद आहे. देवळात गायलेल्या आरतीपासून ते मैफिलीत गायलेल्या रागापर्यंतचे मूळ सामवेदात सापडते. साम म्हणजे गोडवा किंवा गोड बोलणे. त्यामुळेच साम, दाम, दंड, भेद मधील साम चा अर्थ आपल्या लक्षात येईल. अगदी रामायण काळातही अयोध्या, किष्किंधा आणि लंकेतही संगीत ऐकायला मिळत होते. लव कुश या रामपुत्रांनी पित्यासमोर केलेले सुंदर गायन असो की, मृदूंग, शंख यांचा नाद असो तिथेही संगीताचे महत्व दिसून येते. आपल्या महाराष्ट्राला तर वारकरी सांप्रदायाची थोर संगीत परंपरा लाभलेली आहे.
अशा संगीताचा मनावर होणारा सकारात्मक परिणाम न्युरोसायन्सच्या अभ्यासात अनेक शास्त्रज्ञानी वेगवेगळ्या संशोधनातून सिद्ध केला आहे. मन आणि मेंदू या दोन गोष्टी मुळातच वेगळ्या नाहीत. (आपलं मन हे मेंदूत असतं हेच अनेकांना अजून माहित नाही.) मेंदूमध्ये जे वेगवेगळ्या प्रकारचे रसायनं स्त्रवतात, त्या वेगवेगळ्या रसायनांचा आणि मानवी भावभावनांचा संबंध शास्त्रज्ञानी विविध प्रयोगांतून सिद्ध केला आहे. आपल्या मेंदूतील dopamine नावाचं रसायन अतिशय महत्वाचं आहे. आनंद, दुःख, नैराश्य, भीती या सर्व भावनांवर हे dopamine काम करत असतं याचं उदाहरण म्हणजे संगीत ऐकल्यामुळे आपल्या मनात आनंद निर्माण होतो, तो निर्माण करण्याचं काम हे dopamine करत असतं. एक उदाहरण पहा- एखाद्या मॉलमध्ये आपण जातो तेव्हा तिथे शांत असं सुंदर संगीत लावलेलं असतं ते कानावर पडलं की आपला थकवा दूर होतो आणि आपण आनंदी भावनेत जाऊन जास्त सामान खरेदी करुन येतो. 😀 त्यामुळे आपल्या मेंदूतील dopamine level किती ठेवायची हे ही आपण शिकलं पाहिजे. म्हणजेच आनंद, संताप, नैराश्य, भीती या आदिम भावनांवर सौंदर्य संस्कार करण्याचं काम संगीत करते. म्हणूनच संगीताचं मानवी मनाशी असलेलं नातं सांगताना म्हणलं जातं की, Music is a mirror of Emotions. शास्त्रीय संगीत ऐकणं हा एक संस्काराचा भाग आहे. सगळ्यांनाच गायला जमेल असं नाही परंतू सतत असं संगीत कानावर पडलं की लहान मुलं मग हळू हळू ते ऐकू लागतात, मग कान देऊन ऐकू लागतात, त्यानंतर गुणगुणायला लागतात आणि मग त्यानंतर त्यांना त्यात आवड निर्माण होते आणि ती म्हणजेच संगीतातील आस्वादकता!
शास्त्रीय संगीतामुळे शारीरिक क्रिया रिलॅक्स होतात. गायल्याने जास्तीत जास्त श्वास फुफ्फुसात भरला जातो, श्वास रोखून धरण्याचा सराव होतो, स्वरतंतू चांगल्या प्रकारे आंदोलित होतात, एकाग्रता वाढते, संयम वाढतो, श्रवणशक्तीचा विकास होतो, विवेक व विचार विकसित करण्याला मदत होते, शांतता मिळते, स्मरणशक्ती वाढते. यामुळे अभिजात संगीताचे आपल्या आयुष्यातील स्थान अभिजात आहे असं म्हणलं तर वावगं ठरणार नाही. सहा सेकंदाच्या रील करणाऱ्या पिढीला संयम शिकण्यासाठी या संगीताचा नक्कीच फायदा होईल.
प्रत्येकाने तानसेन बनलंच पाहिजे हे शक्य नाही परंतू आपण उत्तम कानसेन तर बनूच शकतो! पु. ल. देशपांडे यांचे एक वाक्य आहे, "उत्तम पेढे बनवायचं कसब नाही जमलं तरी चालेल पण हलवायाशी मैत्री करावी!" त्याप्रमाणे आपण गायक नाही बनलो तरी उत्तम आस्वादक बनू शकतो. त्यामुळे आजची पिढी नेमकं काय ऐकतेय? याची पालक आणि शिक्षक यांनी काळजी घेतली पाहिजे.म्हणजे गुणवत्ता वाढीसाठी वेगळे प्रयत्न करण्याची किंवा ती का वाढत नाही याची काळजी करण्याची गरज पडणार नाही.
परवा कलर्स वाहिनीवरील 'सूर नवा ध्यास नवा' या कार्यक्रमात सुप्रसिद्ध शास्त्रीय गायक महेश काळे यांनी एक सुंदर मत मांडलं आणि ते मला खूप भावलं... ते म्हणाले, " आपल्या आई वडिलांप्रती आपलं प्रेम, आपल्या गुरुप्रती समर्पण भाव, आपल्या मातृभूमीचे ऋण जसे आयुष्यभर पाळायचे असतात, त्याचप्रमाणे आपली संस्कृती, आपलं अभिजात संगीत पण आपणंच पाळायचं असतं!" किती मोलाचा संदेश दिला त्यांनी नवगायकांना!
असे हे अभिजात संगीत टिकावं, वाढावं आणि प्रत्येक बालकात ते रुजावं म्हणून प्रिसीजन फाऊंडेशन, सोलापूर आणि बैठक फाऊंडेशन, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने सध्या प्रायोगिक तत्वावर सोलापूर शहरातील पाच शाळांमध्ये अभिजात संगीताचा वारसा जपावा, त्याचा प्रसार प्रचार होऊन लहान वयातच मुलांवर योग्य संस्कार व्हावे या उदात्त उद्देशाने बैठक @स्कुल हा उपक्रम सुरु झाला आणि या उपक्रमातून मुलांना संतूर, सतार, बासरी, पखवाज, तबला या वाद्यांना आणि कलाकारांना प्रत्यक्ष पाहता आलं, ऐकता आलं, जाणून घेता आलं, त्याचबरोबर शास्त्रीय गायन, धृपद गायन, कथ्थक अनुभवता आलं. पुढेही अनेक असे शास्त्रीय संगीताचे कार्यक्रम आमच्या शाळेत होतीलच आणि त्यातून काही उत्तम तानसेन आणि उर्वरित सगळेच उत्तम, संस्कारक्षम कानसेन होतील यात शंकाच नाही. त्यामुळे इतक्या सुंदर उपक्रमासाठी आमची शाळा निवडली याबद्दल मी प्रिसीजन फाऊंडेशन आणि बैठक फाऊंडेशन दोघांनाही धन्यवाद देईन!
प्रत्येक शाळेत आणि प्रत्येक जिल्ह्यात एकटं प्रिसीजन फाऊंडेशन किंवा बैठक फाऊंडेशन पोहचू शकत नाही, त्यामुळे शाळा, पालक यांनी आपल्या परिसरातील विविध कंपन्यांना त्यांच्या CSR निधीतून आपल्या शाळेत असे उपक्रम राबविण्याचा प्रस्ताव दिला तर नक्कीच सकस जमिनीत सुपीक बियाणे रुजवून त्याची गोड फळे संस्काररुपी झाडाला लगडलेली दिसतील यात तिळमात्र शंका नाही. शास्त्रीय संगीत ही आजीची गोधडी आहे असं समजून तिला जपू या!
अनघा जहागिरदार -गुधाटे, सोलापूर

Infrastructure to School

देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे ।
घेता घेता एक दिवस, देणाऱ्याचे हात घ्यावे ।।
विं. दा. करंदीकर यांच्या या ओळींची यथार्तता क्षणोक्षणी, पुन्हा पुन्हा अनुभवता यावी यासारखं भाग्य ते कोणतं! असा अनुभव घेणारी मी स्वतःला खूप भाग्यवान समजते. सासऱ्यांकडून माझ्या हाती आलेलं (खरं तर त्यांनी अगदी विश्वासाने माझ्या हाती सोपवलेलं) गरीब मुलांना मोफत शिक्षण द्यायचं व्रत जिद्दीने पुढे चालवत असताना अनेक संकटांना, अवघड परिस्थितीला तोंड द्यावे लागत असताना समाजातील असे काही दातृत्व भाव जपणारे आणि आचरणात आणणारे व्यक्तिमत्व सहवासात यावेत हा निव्वळ योगायोग नसावाच, तर आम्ही करत असलेल्या या सेवेला प्रेरणा, प्रोत्साहन आणि मदत मिळावी म्हणून नियतीने घडवून आणलेली ही अमूल्य भेटच! असे मला नेहमी वाटते. जेव्हा जेव्हा खचून जाण्याचे प्रसंग येतात तेव्हा तेव्हा समाजातील असे दातृत्व भाव असणारे व्यक्ती समोर येतात आणि पुन्हा प्रतिकूल परिस्थितीला अनुकूल करण्यासाठी प्रेरणा मिळते. आपण फक्त प्रामाणिक आणि निःस्वार्थ भावनेने कार्य करत राहायचं मार्ग आपोआप तयार होत जातात या वाक्यावर माझा जरी विश्वास असला तरी कधी कधी लडखडायला होतं तेव्हा असे हात समोर येतात...आधार द्यायला!
असेच अनुभव कोविड काळानंतर शाळा सुरु झाल्यावर जून महिन्यापासून यायला लागले. "सेतू इंटरनॅशनल फाऊंडेशन" या अमेरिकास्थित फाऊंडेशनला आमच्या कार्याविषयी माहिती मिळाली आणि त्यांनी आम्ही करत असलेले कार्य जाणून घेतले. आमच्या शाळेत एक सुंदर ग्रंथालय सुरु करण्याचे माझे स्वप्न आहे आणि त्यासाठी सगळ्यात प्राथमिक गरज पुस्तकांची आहे म्हणल्यावर त्यांनी इतकी तत्परता दाखवली की अवघ्या तीन आठवड्यात त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत अनेकांनी शाळेला पुस्तके भेट दिली. जवळपास 600-700 बाल पुस्तके उपलब्ध झाली. त्याचबरोबर त्यांनी त्यांच्या फाऊंडेशनकडून शाळेसाठी एक लॅपटॉप ही भेट दिला आहे. त्यांच्यासोबत शाळेत विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी उपयुक्त अजून अनेक नाविन्यपूर्ण प्रयोग करण्यासंबंधी सकारात्मक चर्चा सुरु असून ते ही यथावकाश पूर्णत्वास जातीलच अशी आशा आहे.
सलग दोन वर्ष मुले शाळेत नाहीत त्यामुळे शालेय गणवेशाचा प्रश्नच नव्हता. परंतू जूनमध्ये शाळा सुरु झाल्यानंतर मुलांच्या गणवेशाचा मोठा प्रश्न शाळेसमोर आ वासून उभा होता. त्यासाठी आर्थिक सहकार्य आवश्यक होतं... अशा वेळी आठवण आली ती "रोटरी इ क्लब ऑफ सोलापूर इलाईट" मधील आम्हाला नेहमी सकारात्मक प्रेरणा देणाऱ्या आणि मदत करणाऱ्या डॉ. गौरी कहाते मॅडम यांची! त्यांना फोन करुन विद्यार्थ्यांच्या गणवेशाची अडचण सांगितली आणि दुसऱ्याच दिवशी त्यांचा फोन आला की आम्ही तुमच्या शाळेतील सर्व मुलांना आमच्या रोटरी क्लबकडून गणवेश देऊ आणि त्याप्रमाणे त्यांनी शाळेतील मुलांना गणवेशाचे वाटपही केले.
आमच्या शाळेच्या पाठीशी नेहमी खंबीर उभा राहणारे प्रिसिजन फाऊंडेशन म्हणजे माझे हक्काचे माहेरघरचं! असं म्हणलं तर वावगं ठरणार नाही. प्रिसिजन फाऊंडेशनच्या अध्यक्षा आदरणीय सुहासिनी शहा मॅडमना फक्त पाहिलं तरी एक वेगळीच ऊर्जा अंगात संचारते. यापूर्वीही अगदी शाळेला सोलर सिस्टीमसह प्रोजेक्टर दिलेल्या या फाऊंडेशनने आमच्या शाळेत बैठक @ स्कुल सारखा मुलांमध्ये लहान वयातच शास्त्रीय संगीताची आवड निर्माण करणारा उपक्रम सुरु केला आहे, त्यासोबतच वाचनाची आवड निर्माण करणारा युनिक फिचर्सचा पासवर्ड प्रकल्प असेल किंवा आत्ता आत्ता येऊ घातलेला बालनाट्याभिनय उपक्रम असेल अशा अनेक उपक्रमांमधून आमच्या विद्यार्थ्यांचे भविष्य उज्ज्वल करु पाहणाऱ्या या फाऊंडेशनबद्दल मनात कायम कृतज्ञता असते.
अशा या सगळ्या सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या संस्थांसोबत माझे हक्काचे घर असलेल्या सर फाऊंडेशनमुळे अनेकांसोबत आपुलकीचे सुंदर बंध तयार झाले आहेत. या सर्वांच्या मदतीने ही शिक्षणाची ज्ञानगंगा तळागाळातील मुलांपर्यंत पोहचविण्याचा आणि त्यातील प्रत्येक विद्यार्थी हा भविष्यात समाजाचा एक आदर्श व सामाजिक भान जपणारा नागरिक म्हणून समोर यावा यासाठी प्रयत्न सुरु आहे. आपल्या हृदयातील सर्वात सुखकारक भावना कोणती असेल तर ती दातृत्वाची! जेव्हा जेव्हा आपण निःस्वार्थ भावनेने दान करतो त्यावेळी हृदयात जाणवणाऱ्या परमोच्च समाधानाची तुलना दुसऱ्या कशातच होऊ शकत नाही! अशा या सगळ्याच दातृत्वाचा भाव जपणाऱ्या आणि आचरणात आणणाऱ्या प्रत्येकासाठी खालील ओळी अगदी मनापासून म्हणाव्या वाटतात.... "मेघापरी हे जीवन व्हावे... सर्वस्वाचे दान करावे, रिक्त होऊनि स्वतः आपण दुसऱ्याचे अंगण फुलवावे." प्रिसिजन फाऊंडेशन, सोलापूर, सेतू इंटरनॅशनल फाऊंडेशन, अमेरिका, रोटरी इ क्लब ऑफ सोलापूर इलाईट, सर फाऊंडेशन, महाराष्ट्र आपणा सर्वांच्या मदतीने हा ज्ञानाचा रथ ओढत असताना आपल्याबद्दल असणारा कृतज्ञता भाव आपोआपच व्यक्त व्हायला लागतो. Thank you so much all of you.

Password Campaign

प्रिसिजन फाऊंडेशनच्या माध्यमातून युनिक पासवर्डच्या साहाय्याने सुरु असलेल्या पासवर्ड वाचन प्रकल्पांतर्गत आमच्या शाळेतील मुलांचे मागील अंकातील लिखाणाबद्दल बक्षीस वितरण आणि पुढील अंकाचे वाटप कार्यक्रम बुधवार दि. २९/१२/२०२१रोजी जेष्ठ सामाजिक कार्यकर्त्या आदरणीय रेणूताई गावस्कर यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला.
या कार्यक्रमप्रसंगी रेणुताईंनी शाळेत पाऊल ठेवताच तुमची शाळा ही शाळा नसून प्रेमाची ऊब असलेले छोटे, सुंदर घर वाटतेय अशा शब्दांत शाळेबद्दल भावना व्यक्त केल्या. मुलांशी अतिशय सुंदर संवाद साधत गोष्टीच्या आणि गाण्याच्या माध्यमातून मुलांच्या भावविश्वात शिरून त्यांच्याशी कसं एकरूप होता येतं याचा उत्तम वस्तूपाठच रेणूताईंनी आम्हा उपस्थितांना दिला. जवळपास पाऊण तास मुलं गोष्टीच्या कल्पनाविश्वात रममाण झाली होती. त्यानंतर त्यांनी ज्या देशातील मुले हसरी असतात त्या देशाचे भविष्य उज्ज्वल असते असे सांगून त्या आशयाचे कृतियुक्त गाणे मुलांसमवेत गायले. खाण कामगारांच्या मुलांसोबत त्यांना आलेले अनुभव ही त्यांनी यावेळी कथन केले. यदुनाथ थत्ते, ना. सि. फडके यांचा दीर्घ सहवास आणि त्यातील अनेक अनुभव, प्रसंग त्यांनी सांगितले. जाता जाता मुलांना, "तुम्ही जेव्हा शिकून खूप मोठे व्हाल तेव्हा एका तरी गरजू मुलाला शिक्षणासाठी मदत करा." असे भावनिक आवाहन केले. रेणूताईंचा सहवास लाभणं म्हणजे माझ्यासारख्या शिक्षिकेला आपलं काहीतरी पुण्यकर्म फळाला आल्यासारखं वाटणंच आहे.
प्रिसिजन फाऊंडेशनच्या अशा अनेक शैक्षणिक उपक्रमांतून आमच्या शाळेला अशा कितीतरी उदात्त विचारांच्या व्यक्तिमत्वांचा पदस्पर्श होतोय आणि त्यांच्या विचारांच्या छात्रछायेखाली आम्हाला काहीकाळ का होईना विसावता येतंय हे आमचे परमभाग्यच! प्रिसिजन फाऊंडेशन आणि युनिक पासवर्ड टीमचे मनःपूर्वक धन्यवाद!
- अनघा राघवेंद्र जहागिरदार. श्रीमती कमला नेहरु प्राथमिक मराठी शाळा, जुळे सोलापूर

Interactive E-learning Project

आधी प्रिसिजन फाऊंडेशनचं नाव फक्त विविध वृत्तपत्रं, जाहिराती व रेडिओच्या माध्यमातून ऐकलं होतं, पण दैनिक सकाळचे सहयोगी संपादक मा. अभय दिवाणजी यांच्या माध्यमातून आदरणीय यतीन शहा व डॉ. सुहासिनी शहा व प्रिसिजनचे जनसंपर्क अधिकारी माधव देशपांडे यांच्याशी संपर्क झाला व त्यातूनच पुढं प्रिसिजन फाऊंडेशन व आम्ही चालवत असलेली स्टेट इनोव्हेशन ॲन्ड रिसर्च फाऊंडेशन महाराष्ट्र अर्थात सर फाऊंडेशन महाराष्ट्र या दोन संस्था एकत्र येऊन शिक्षण क्षेत्रात काहीतरी नवा व चांगला बदल घडवण्यासाठीचं काम सुरू झालं.
तत्पूर्वी प्रिसिजन फाऊंडेशननं आमच्या नकळतपणे आमचं परीक्षण करून सन २०१६ च्या 'प्रिसिजन गप्पा' या कार्यक्रमात 'स्व. सुभाष रावजी शहा सामाजिक कृतज्ञता पुरस्कार' देऊन सर फाऊंडेशनचा गौरव केला व तिथून पुढं हे नातं अधिक चांगलं रुजायला सुरुवात झाली. 'प्रिसिजन ई-लर्निंग प्रोजेक्ट' या महत्त्वाकांक्षी प्रकल्पात आम्ही सहयोगी संस्था म्हणून सोबत काम करत आहोत, जे आजतागायतही सुरूच आहे. यानंतर आविष्कार : शोध... नवकल्पना असणाऱ्या बालसर्जकांचा! यासाठी आर्थिक पाठबळ देणं व आयडियाबाज मुलं शोधणं यासाठी प्रिसिजनचं सहकार्य लाभलं. अभिजात कला जिवंत राहायला हव्यात, त्याचं योग्य संवर्धन झालं पाहिजे व त्या कलांबद्दल आत्ताच्या पिढीत लहानपणापासूनच रुची निर्माण व्हावी यासाठी पुण्याच्या बैठक फाऊंडेशनच्या माध्यमातून या क्षेत्रात नावाजलेल्या कलाकारांना घेऊन 'बैठक@स्कूल' हा उपक्रम २०१९ पासून सातत्यानं चालू आहे.
जगातील कॅमशाफ्ट निर्मितीतील एक 'मातब्बर कंपनी' सोलापूरमध्ये आहे याचा एक 'सोलापूरकर' या नात्यानं विशेष अभिमान आहे. प्रिसिजनकडून बऱ्याच गोष्टी शिकण्यासारख्या आहेत. जसे की नियोजन, तंतोतंतपणा, टापटीपणा, वक्तशीरपणा या गोष्टी आम्ही आमच्यामध्ये बाणवण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न करत आहोत. सामाजिक बांधिलकी कशी जपावी? काळानुरूप स्वतःमध्ये बदल करत भविष्याचा वेध कसा घ्यावा? यांसारख्या अनेक गोष्टी प्रिसिजनकडून शिकण्यासारख्या आहेत. याशिवाय आरोग्य, शिक्षण, संगीत, कला, पर्यावरण, सामाजिक कार्य या व अन्य क्षेत्रातील प्रिसिजनचं योगदान अमूल्य आहे. 'प्रिसिजन संवेदना' च्या माध्यमातून हे मांडण्याची संधी देखील आम्हाला प्रिसिजन फाऊंडेशनकडूनच मिळाली. सन २०१८ चा 'सर सन्मान' पुरस्कार प्रिसिजनचे सर्वेसर्वा, मा. यतीन शहा व प्रिसिजन फाऊंडेशनच्या अध्यक्षा डॉ. सुहासिनी शहा यांना तर २०१९ चा 'सर सन्मान' प्रिसिजनचे जनसंपर्क अधिकारी मा. माधव देशपांडे यांना देऊन गौरविल्याने या 'सन्मानाचाच सन्मान' अधिक वाढला आहे.
सोलापूर आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव असो की, नारीशक्ती सन्मान, प्रिसिजन गप्पा असो की, सर फाऊंडेशनच्या राष्ट्रीयस्तर कॉन्फरन्स या दोन्ही संस्था एकमेकांसोबत असतात. यानिमित्तानं ही 'नात्याची वीण' अधिक घट्ट विणली गेलीय. सर फाऊंडेशनच्या या प्रवासात प्रिसिजनचं महत्त्व 'परीसस्पर्श' सारखं आहे. ज्यामुळं आम्हाला 'सोनं' होण्याचं भाग्य लाभलं. इथून पुढंही प्रिसिजन फाऊंडेशन व सर फाऊंडेशनचं हे 'अतूट नातं' अधिकच बहरत राहील. या नात्याबद्दल मी इतकंच म्हणेन "अभी थोडा कुछ किया है, और आगे बहुत कुछ करना बाकी है|" धन्यवाद!
- राजकिरण चव्हाण, आयटी विभाग प्रमुख, सर फाऊंडेशन, महाराष्ट्र

Password campaign

श्री समर्थ विद्यामंदिरच्या 'समर्थ' वाटचालीमध्ये प्रिसिजन फाऊंडेशनचा फार मोठा हात आहे. ई-लर्निंग प्रोजेक्टच्या माध्यमातून इंटरॅक्टिव्ह पॅनल, इंट्रॅक्टिव्ह टीव्ही सोबतीला सोलर सिस्टीम आणि बैठक@स्कूल व आविष्कार यांसारख्या कार्यशाळांसाठी भक्कम अशी साथ प्रिसिजनने दिली आहे. परिणामी, शाळेचा नावलौकिक वाढला आहे.
- श्री राजकिरण चव्हाण, सहशिक्षक, श्री समर्थ विद्यामंदिर, शास्त्रीनगर, सोलापूर

Comprehensive Sexuality Education

महिला वरील अत्याचाराबद्दल पुष्कळ बोललं जातं, चर्चा होतात, कायदे केले जातात. विविध स्तरावर उपाययोजना सुचवले जातात, तरीही धक्कादायक घटना कानावर पडतातच. बालकावर होणाऱ्या लैंगिक अत्याचाराची आकडेवारी संपूर्ण देशात आणि महाराष्ट्रात सुन्न करून टाकणारी आहे. कितीही कायदे झाले, शिक्षा झाल्या, पण प्रमाण कमी होत नाही. बलात्कार, लैंगिक शोषण यांचे प्रमाण का वाढते? विकृती असते, मानसिक दुर्बलता आहे. स्त्रीबद्दलच्या दृष्टिकोन, हिंसक वृत्ती, कौटुंबिक बाबी अशी विविध कारणे असतात. परंतु सरसकट असे शब्द किंवा विशेषण वापरून पुरुष वृत्तीचे सामान्यीकरण करून हा प्रश्न सुटत नाही हे नक्की! त्यातूनच मुला-मुलींना जैविक प्रेरणेची जाणीव द्यावी असा विचार डॉक्टर सुहासिनी शहा मॅडमनी केला. आम्हाला भक्कम साथ मिळाली, ती मूल्याधारित समाज रचना, सामाजिक भान, वैज्ञानिक जाणीव, संस्कार यांची सांगड घालून समाजात पाऊल ठेवायला सक्षम करण्यासाठी मुलांना मदत करणाऱ्या सोलापुरातील प्रिसिजन फाउंडेशनची.... प्रिसिजन फाउंडेशनने कायमच "आऊट ऑफ बॉक्स" विचार करून प्रोजेक्ट निवडले आहेत. वरवरचं तात्पुरतं सामाजिक काम करण्याऐवजी शाश्वत परिणामकारक सोल्युशन ओरिएंटेड काम करण्यावर प्रिसिजन फाउंडेशनचा भर राहिला आहे. सर्वंकष लैंगिकता शिक्षण हा असाच एक महत्त्वाचा संवेदनशील विषय. या विषयावर ठोस काम करण्याची आवश्यकता प्रिसिजन फाउंडेशनच्या अध्यक्षा डॉ. सुहासिनी शहा यांना जाणवली. डॉ. सुहासिनी शहा प्रिसिजन फाउंडेशनच्या फक्त अध्यक्ष म्हणून नव्हे तर एक व्यक्ती आणि डॉक्टर म्हणून त्यांना हा विषय महत्त्वाचा वाटला. किशोरवयीन शाळा व कॉलेजमधील मुला मुलींसाठी ग्राउंड लेव्हलवर काम करण्याची त्यांची खूप इच्छा होती. विषयाचं गांभीर्य आणि त्याचा आवाका मोठ्या असल्याने वर्षभर ऍक्टिव्हिटी बेस्ड उपक्रम राबवता येईल का? आणि या उपक्रमाची व्याप्ती कशी वाढवावी याबद्दल विचार डॉ. सुहासिनी शहा मॅडम करत असतानाच फॅमिली प्लॅनिंग असोसिएशन ऑफ इंडियाच्या सोलापूर शाखेची संपर्क आला, राष्ट्रीय माजी कोषाध्यक्ष डॉ. श्रीकांत येळेगावकर व फॅमिली प्लॅनिंग असोसिएशन ऑफ इंडियाच्या माजी अध्यक्षा डॉ. नभा काकडे, चेअरपर्सन डॉ.एन.बी. तेली यांच्या नेतृत्वाखाली ही संस्था आरोग्याच्या क्षेत्रात मोठे योगदान देत आहे. त्यानंतर प्रिसिजन फाउंडेशन आणि एफ पी ए आय यांनी सामंजस्य करार केला. त्यानुसार १० ते २४ वयोगटातील शाळा, कॉलेज व शाळाबाह्य विद्यार्थ्यांपर्यंत सर्वांकष लैंगिकता शिक्षण (Comprehensive Sexuality Education) हा विषय समजावून सांगितले. त्यामध्ये वयात येताना होणारे शारीरिक, मानसिक आणि भावनिक बदल, तसेच बालकांचे शोषण, त्यांच्या सोबतचे गैरवर्तन, गुड टच बॅड टच, लिंग भेदावर आधारित हिंसाचार, एचआयव्ही आदी विषयांबाबत माहिती दिली जाते. लैंगिक आरोग्य व स्वच्छता, सकस आहार आदी विषयी समुपदेशनही केले जात आहे. विशेष म्हणजे इंडोर गेम्स आणि ऍक्टिव्हिटीच्या माध्यमातून मनोरंजना तून ज्ञान या संकल्पनेचा वापर करून विद्यार्थ्यांच्या कलेने हा विषय मांडला जात आहे. या उपक्रमांतर्गत शाळा व वस्त्यांमध्ये युथ सेंटर स्थापन करून त्यांना मोफत खेळाचे साहित्य वाटप करण्यात आले. लैंगिकते संबंधित समस्या, अडचणी सोडवण्यासाठी, तसेच समुपदेशनातून हा विषय पोहोचवण्यासाठी या सेंटर्स कार्यरत असतील. तसेच ट्रेनिंग अधिक इफेक्टिव्ह होण्यासाठी त्याबाबतची माहिती शाळेतील शिक्षक व पालक यांनाही समजावून सांगितली गेली. प्रिसिजन फाउंडेशन पुरस्कृत सर्वंकष लैंगिक शिक्षण कार्यक्रमात सहभागी होणाऱ्या शाळा कॉलेजमधील मुलींना तीन महिन्यासाठी लागणारे सॅनिटरी पॅड मोफत देण्यात आले.या प्रकल्पांतर्गत शाळा, कॉलेज व शाळाबाह्य मुला मुलींची मोफत हिमोग्लोबिन तपासणी करण्यात आली. मेहनतीचे चांगले परिणाम दिसायला लागले आहेत. लैंगिकता हा टाळण्याचा विषय नसून त्याबद्दल शास्त्रोक्त माहिती मिळवण्याचा अधिकार सर्वांना आहे. सर्वांच्या प्रयत्नातून आगामी पिढ्यांना या महत्त्वाच्या विषयाबद्दल योग्य माहिती मिळत राहील आणि एक सशक्त समाज निर्मितीच्या दिशेने आपण पुढे जाऊ अशी सदिच्छा डॉ. सुहासिनी शहा यांनी दिल्या. या प्रकल्पासाठी प्रिसिजन फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. सुहासिनी शहा, जनसंपर्क अधिकारी श्री. माधव देशपांडे, सहाय्यक जनसंपर्क अधिकारी वैशाली बनसोडे, फॅमिली प्लॅनिंग असोसिएशन ऑफ इंडियाचे माजी राष्ट्रीय कोषाध्यक्ष डॉ. श्रीकांत येळेगावकर, चेअरपर्सन डॉ.एन.बी. तेली, डॉ. आयेशा रंगरेज, डॉ. नभा काकडे, प्राचार्य के. एम. जमादार, सपना चिट्टे, डॉ. राजीव प्रधान, डॉ. विजया महाजन, शाखाधिकारी सुगतरत्न गायकवाड व कार्यकारिणी सदस्यांनी वेळोवेळी मार्गदर्शन आणि सहकार्य केले. हा प्रकल्प यशस्वी करण्यासाठी कार्यक्रम अधिकारी वीरेंद्र परदेशी, कम्युनिटी मोबिलायझर मनीषा वांगीकर, सुरेखा ढबरे, सत्यभामा कांबळे,स्वप्नील फर्नांडिस, ड्रायव्हर करण खानापुरे आदींचे योगदान लाभले.
- वीरेंद्र परदेशी

प्रिसिजन फाउंडेशन आणि फॅमिली प्लॅनिंग असोसिएशन ऑफ इंडिया सोलापूर शाखा यांच्यामधील सामंजस्य कराराने सर्वंकष लैंगिकता शिक्षण या प्रकल्पास दमदार सुरुवात झाली.
२१ वे शतक उगवले ते तंत्रज्ञान नावाची जादूची कांडी घेऊनच तंत्रज्ञानाने आपल्या आयुष्यातील अनेक गोष्टी सोप्या करून टाकल्या. पण त्याचबरोबर कधीही न अनुभवलेल्या समस्या निर्माण केल्या. मोबाईल नावाच्या वस्तूने प्रत्येक समाज घटकाचे आयुष्य व्यापून टाकले. जगाच्या दोन कोपऱ्यातील माणसांना मोबाईल ने जवळ आणले. पण घरातल्याच दोन व्यक्तींच्या नात्यांमध्ये तो अडथळा बनून राहिला. संपर्क वाढला पण संवाद मात्र खुंटला, थांबला. याचे दुष्परिणाम सर्वांनाच जाणवायला लागले. सगळ्यांचे लाडके असणारे घरातील लहान मूल सुद्धा तासंनतास मोबाईलवर रमायला लागले. या वर्चुअल आजी-आजोबांना नातवंडाला गुंतवून टाकले. पोटची मुले मोबाईलमध्ये, टीव्हीवर, लॅपटॉपवर काय बघताहेत हे तपासणे गरजेचे आहे. या सगळ्या वातावरणाचा परिणाम म्हणून नको त्या घटना घडायला लागल्या. अल्पवयीन मुलाकडून चिमुरडीचे लैंगिक शोषण "... अशा घटना वारंवार घडत आहेत. हे का घडत असेल? नको त्या वयात नको त्या गोष्टी ही मुले का करत असतील? ही एक विकृतीच आहे. बारकाईने विचार केल्यावर आपल्या लक्षात येईल की यांच्या मुळाशी लैंगिकता शिक्षणाचा अभाव हेच कारण आहे. प्रिसिजन फाउंडेशन कडून शाळा, कॉलेज व शाळाबाह्य विद्यार्थ्यांसाठी सर्वंकष लैंगिकता शिक्षण हा उपक्रम राबवला जातो.
मुलं मुली हे स्मार्टफोन, इंटरनेट वापरतात. विशेषतः इंटरनेटवर अक्षरशा लाखोच्या संख्येने उपलब्ध असणारी पॉर्नग्राफिक संकेत स्थळे आणि त्यातून दाखवली जाणारी लैंगिकता विकृती भारतात सहजासहजी उपलब्ध होणारे लैंगिक साहित्य आणि पोर्नोग्राफिक फिल्म यांचा नकारात्मक परिणाम मुलावर होऊ नये म्हणून त्यांचा निकोप काम जीवनाची ओळख, शरीराची ओळख, शाळा व महाविद्यालयातच करून दिली पाहिजे. तसेच समाजात बलात्कार, लैंगिक अत्याचाराच्या घटना, अल्पवयीन मुलींना वेश्या व्यवसाय करायला लावणे अशा अनेक घटना घडतात. यामागे अनेक कारण आहेत. एक महत्त्वाचं कारण, ते म्हणजे लैंगिकता शिक्षणाचा अभाव.
अशा संवेदनशील असलेल्या या विषयावर बोलायला माणसे संकोचतात ही कोंडी फोडण्यासाठी प्रिसिजन फाउंडेशनने हा उपक्रम सुरू केला आहे. या अशा वातावरणात दररोजचे वर्तमानपत्र उघडल्यास बाल लैंगिक शोषणाच्या घटना पहावयास मिळतात. यामध्ये प्रामुख्याने अल्पवयीन मुलींवर सामूहिक अत्याचार, अल्पवयीन विद्यार्थिनीवर शिक्षकांचा लैंगिक अत्याचार, स्वतःच्या मुलीवर बापाचे व जवळच्या नातेवाईकाचे दुष्कर्म, युवतीवर एसआरपीएफ जवानाकडून अत्याचार, अडीच वर्षाच्या मुलीवर अत्याचार, पंधरा वर्षीय दुष्कर्म पीडितेने गर्भपात केला नाही म्हणून जात पंचायतीने वाळीत टाकले, मुलीच छेड काढून घरासह पेटवून देण्याचा प्रयत्न, तीन महिन्यापासून बापाचा मुलीवर अत्याचार, मुलीवर गॅंगरेप, महिला पोलिसावर अत्याचार, लघुशंकेसाठी घराबाहेर पडल्यावर अत्याचार, ज्युनिअर कॉलेजच्या विद्यार्थिनीला ब्लॅकमेल करून दोन ते तीन महिन्यापासून अत्याचार, पाच वर्षाच्या बालिकेवर अठरा वर्षाच्या युवकांकडून अत्याचार अशा घटना वाचायला ऐकायला मिळत आहेत. याचा अर्थ स्त्री जातीकडे बघण्याचा पुरुषाच्या दृष्टिकोन हा भोग वस्तू म्हणून झाला आहे. या अशा क्लिष्ट वातावरणात एकही बालिका युवती स्त्री या सुरक्षित नाही हे वरील सत्य घटनांमधून दिसून येते. यासाठी सर्व शाळा, हायस्कूल, ज्युनिअर कॉलेज, महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना व शाळाबाह्य युवक युवती यांना शिक्षणाच्या माध्यमातून जागृत करणे महत्त्वाचे झाले आहे.
यासाठीच सायबर विषयी जनजागृती करण्यासाठी सायबर क्राईम शहर आणि ग्रामीण विभागाकडून माहिती देण्यात येते. सायबर क्राईम शहर विभागाकडून ही माहिती देण्यासाठी वरिष्ठ पोलीस इन्स्पेक्टर श्री शौकत अली सय्यद, पोलीस उपनिरीक्षक विजेंद्रसिंग बायस, अमोल कानडे,बाबू मंगरुळे, करण माने,अर्जुन गायकवाड वसीम शेख, अश्विनी लोणी, प्रांजली काळे, भाग्यश्री वाले, कपिल जावळे, अविनाश तळेगावकर, श्रीरंग कुलकर्णी,अविनाश पाटील, मच्छिंद्र लोंढे तर सायबर क्राईम ग्रामीण विभागाकडून योगेश नरवडे, युसुफ पठाण, अन्वर आत्तार , रवींद्र गायकवाड, खंडू माळी, योगेश मोरे,पूजा सन्नाके, अभिजीत पेठे यांनी सेशन घेतले.
सायबर विषयी जनजागृती करत असताना काही व्हिडिओज आणि केस स्टडी सांगून किशोरवयीन मुला-मुलींना समजावून सांगण्याचा प्रयत्न करण्यात आला. अडचणीच्या कालावधीमध्ये काय करावयाचे? या विषयाची मार्गदर्शन करण्यात आले. शाळा, महाविद्यालय व शाळाबाह्य किशोरवयीन मुला मुलीं पर्यंत सायबर विषयी जनजागृती हा विषय घेऊन जाण्यासाठी प्रिसिजन फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. सुहासिनी शहा मॅडम यांचे सहकार्य लाभले आणि त्यांच्या मदती विना हे कार्य अशक्यच होते. पब्लिक रिलेशन ऑफिसर श्री माधव देशपांडे, असिस्टंट पब्लिक रिलेशन ऑफिसर वैशाली बनसोडे, संदीप पिसके व फॅमिली प्लॅनिंग असोसिएशन ऑफ इंडिया शाखेचे मार्गदर्शक डॉ श्रीकांत येळेगावकर, चेअरपर्सन डॉ.एन.बी. तेली, माजी अध्यक्ष डॉ. नभा काकडे, डॉ. आयशा रंगरेज, डॉ. राजीव प्रधान व कार्यकारी मंडळाचे मार्गदर्शन लाभले. फॅमिली प्लॅनिंग सोलापूर शाखेचे शाखाधिकारी श्री सुगतरत्न गायकवाड यांचे सततचे मार्गदर्शन व पाठपुरावा केला. कार्यक्रम अधिकारी वीरेंद्र परदेशी यांचे प्रत्यक्षात प्रकल्पास योगदान तर सर्व कर्मचाऱ्यांचे अतूट असे परिश्रम हा प्रकल्प राबवताना पहावयास मिळाले.
-वीरेंद्र परदेशी

कर्णबधिर बाळांचे पालक आपल्या पाल्याला घेऊन आमच्याकडे येतात आणि त्यांना घरगुती वातावरणामध्ये बोलायला कसे शिकवायचे हे स्वतः समजून घेतात आणि तसे घरी त्यांना बोलायला शिकवतात. असे आमच्या संस्थेच्या कामाचे थोडक्यात स्वरूप...वाईस ऑफ वाईसलेस अभियान या आमच्या संस्थेचे काम राहत्या घरातल्याच दहा बाय दहाच्या एका खोलीमध्ये चालत असे. वर्तमानपत्रातील बातम्या वाचून 'प्रिसिजनने' आमच्याशी संपर्क केला. खरे तर एखाद्या सामाजिक कामाचे महत्त्व ओळखून अशा संस्थेचा शोध घेत तिथपर्यंत पोहोचणे आणि त्यांना हवी अशी मदत करणे ही ' प्रिसिजनची ' खासियत ! असेच आमचेही झाले.
सुरुवातीला " प्रिसिजन " ने आमच्या संस्थेस पुरस्कार देऊ केला. या पुरस्कारामुळे आम्हाला काम करण्यासाठी आत्मविश्वास आणि प्रेरणा मिळाली. पुरस्कार आपल्या कामाची जबाबदारी देखील वाढवतो हे अधोरेखित केले. आमच्या संस्थेची गरज ओळखून राहत्या घरातल्या खोलीमध्ये सुरू असलेले काम त्यांनी " बोलवाडी तारांगण " या सुसज्ज अशा मोठ्या इमारतीमध्ये चालू करून दिले.
"ताट-वाटी चाचणी”......
सोलापूर जिल्ह्यातील कर्णबधिर बाळांचा शोध घेण्यासाठी "प्रिसिजन " च्या सहकार्याने अंगणवाडी कार्यकर्तीच्या मार्फत जिल्हाभर " ताट - वाटी चाचणी " चे घरोघरी प्रयोग करण्यात आले. या प्रयोगातून जिल्हाभरातील सुमारे 189 बालके आढळली. या बालकांना संस्थेने पुढील तीन वर्षांमध्ये स्पीच थेरपीचे धडे देऊन बोलायला शिकवले.

हा प्रयोग राज्यभर गाजला. केंद्र सरकारच्या मसुरी येथील आय. ए. एस. अकादमीने या प्रयोगाचे सादरीकरण आणि आय. ए.एस. प्रशिक्षणार्थींना "ग्रासरूट इनोवेशन" उपक्रमांतर्गत संस्थेचे तीन दिवसाचे प्रशिक्षण देण्यासाठी मसुरी येथे संस्थेला आमंत्रित केले.
संस्थेच्या वतीने सुरू असलेल्या "लोकसत्ता - सर्वकार्येषु सर्वदा" या निवासी संकुलाच्या बांधकामासाठी नियमित पाणीपुरवठा व्हावा म्हणून " प्रिसिजनने " संस्थेला सोलार पंप कार्यप्रणाली देऊ केली. त्यामुळे पुढील बांधकाम सुरळीत पार पडले. याशिवाय संस्थेच्या आवारामध्ये विद्युत दिवे, संस्थेच्या बालकांसाठी गरजेनुसार हवे असलेले साहित्य असे वेळोवेळी कंपनी सहकार्य करत असते. आज कंपनीच्या सहकार्यामुळेच संस्था आपले काम पुढे नेत आहे. वेगवेगळे प्रयोग करत आहे...

- जयप्रदा भांगे
अध्यक्ष, वाईस ऑफ अभियान
शेटफळ तालुका मोहोळ जिल्हा सोलापूर....
Web site - www.bolwadi.org

The 20kW solar rooftop system funded by Precision Camshafts is a significant step towards our goal of harnessing clean and renewable energy to power our operations. This initiative not only aligns with our commitment to corporate social responsibility but also exemplifies a shared vision for a greener, more sustainable future.

Your dedication to corporate philanthropy and community development has a lasting impact on our organization .The Solar Rooftop Electricity Project not only reduces our carbon footprint but also serves as a beacon of inspiration for others to follow suit.

We would like to extend our appreciation to the entire Precision Camshafts team for their commitment to making a positive difference. Your investment in this project goes beyond the tangible benefits of electricity generation; it fosters a culture of environmental consciousness and responsible corporate citizenship.

As we embark on this exciting journey towards a more sustainable future, please consider this letter as a token of our heartfelt thanks for your invaluable contribution. We look forward to sharing the progress and success of the Solar Rooftop Electricity Project with you in the coming months.

Once again, thank you for your unwavering support. Precision Camshafts Limited has not only brightened our operations but has also illuminated the path towards a cleaner and more sustainable future.

With sincere gratitude,

Dr. Pratik Shivagunde
Secretary
Adhar Vishwastha Sanstha

जग कार्बन मुक्तीच्या दिशेने जात असतांना छोट्या छोट्या गावातील लोकांनी कार्बन मुक्तीचा संकल्प केला पाहिजे. एखादा शेतकरी जेंव्हा चूल वापरतो किंवा LPG वापरतो तेंव्हा तो कार्बन उत्सर्जनास अप्रत्यक्ष मदत करीत असतो. असा गावातील लोकांनी जर बायोगॅस बांधले, प्रिसिजनच्या माध्यमातून जर मदत केली तर एका अर्थाने छोट्या गावातील कार्बन मुक्तीची जी लढाई आहे त्याचा शेतकरी सैनिक होऊ शकतो. बायोगॅस हा फक्त इंधन समस्येच उत्तर नाही तर जागतिक तापमान वाढीमध्ये छोट्या शेतकऱ्याचे एक मोठं contribution आहे. या दृष्टीने बायोगॅस महत्वाचा आहे. यासाठी प्रिसिजनच्या सहाय्याने आम्ही सोलापूर मध्ये काम करीत आहोत.
डॉ प्रसाद देवधर
अध्यक्ष, भगीरथ ग्रामविकास प्रतिष्ठान कुडाळ, जि सिंधुदुर्ग

GET IN TOUCH

CONTACT

Precision Foundation & Medical Research Trust

Registered Office:
51 Sarvoday Housing Society,
Mahavir Chowk, Opp. ICICI Bank,
Hotgi Road,
Solapur - 413003, Maharashtra India





  • Phone:
  • +91-9049007450

    +91-217 2357641

  • Fax:
  • + 91 217 2357645

  • Name:
  • Mr. Madhav Deshpande

CONTACT

Precision Foundation & Medical Research Trust

Registered Office:
201/27 Sarvoday Housing Society,
Mahavir Chowk, Opp. ICICI Bank,
Hotgi Road, Solapur -413003,
Maharashtra, India